ganesh-5998483_1280

श्री गणपति स्तोत्र

जयजयाजी गणपती । मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती । स्फूर्ति द्यावी मज अपार ॥ १ ॥ तुझें नाम मंगलमूर्ति । तुज इंद्रचंद्र ध्याती । विष्णु शंकर तुज पूजिती । अव्यया ध्याती नित्यकाळी ॥ २ ॥ तुझें नांव विनायक | गजवदना तूं मंगलदायक | सकळ विघ्नें कलिमलदाहक । नामस्मरणें भस्म होती ॥ ३ ॥ मी तव चरणांचा अंकित । तव चरणां माझे प्रणिपात । देवाधिदेवा तूं एकदंत । परिसें विज्ञापना एक माझी ॥ ४ ॥ माझा लडिवाळ तुज करणें । सर्वांपरी तूं मज सांभाळणे । संकटमाझारीं रक्षिणें । सर्व करणें तुज स्वामी ॥५॥ गौरीपुत्रा तूं गणपती । परिसावी सेवकाची विनंती । मी तुमचा अनन्यार्थी । रक्षिणे सर्वार्थेचि स्वामिया ॥ ६ ॥ तूंच माझा बापमाय । तूंच माझा देवराय । तूंच माझी करिसी सोय । अनाथनाथा गणपती ।। ७ ।। गजवदना श्रीलंबोदरा । सिद्धिविनायका भालचंद्रा । हेरंबा शिवपुत्रा । विघ्नेश्वरा अनाथबंधु ॥ ८ ॥ भक्तपालका करी करुणा । वरदमूर्ती गजानना। परशुहस्ता सिंदूरवर्णा । विघ्ननाशना मंगलमूर्ति ॥ ९ ॥ विश्ववंदना विघ्नेश्वरा । मंगलाधीशा परशुधरा । पापमोचना सर्वेश्वरा । दीनबंधु नमन माझें ॥ १० ॥ नमन माझें शंभुतनया | नमन माझें करुणालया । नमन माझें गणराया | तुज स्वामिया नमन माझें ।। ११ ।। नमन माझें देवराया । नमन माझें गौरीतनया । भालचंद्रा मोरया । तुझे चरणीं नमन माझें ॥ १२ ॥ नाहीं आशा स्तुतीची । नाहीं आशा तव भक्तीची । सर्व प्रकारें तुझिया दर्शनाची । आशा मनीं उपजली ॥ १३ ॥ मी मूढ केवळ अज्ञान । ध्यानीं तुझे सदा चरण। लंबोदरा मज देईं दर्शन। कृपा करी जगदीशा ।। १४ ।। मतिमंद मी बालक । तूंचि सर्वांचा चालक | भक्तजनांचा पालक । गजमुखा तूं होशी ॥ १५ ॥ मी दरिद्री अभागी स्वामी । चित्त जडावें तुझिया नामीं । अनन्य शरण तुजला मी । दर्शन देईं कृपाळुवा ।। १६ ।। हैं गणपतिस्तोत्र जो करी पठण । त्यासी स्वामी देईल अपार धन विद्या-सिद्धीचें अगाध ज्ञान | सिंदूरवदन देईल पैं । । १७ ।। त्यासी पिशाच्च भूत प्रेत । न बाधिती कदाकाळांत । स्वामीची पूजा करोनि यथास्थित । स्तुतिस्तोत्र हें जपावें ॥ १८ ॥ होईल सिद्धी षण्मास हें जपतां । नव्हे कदा असत्य वार्ता । गणपतिचरणीं माथा । दिवाकरें ठेविला ॥ १९ ॥ इति श्री गणपतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

॥ श्रीगजाननर्पणमस्तु ॥

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *